हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तास विदर्भावर अशीच संततधार सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर : २८ ऑगस्ट - नागपूरसह विदर्भात काल रात्रीपासून पावसाची अखंड संततधार सुरु आहे. परिणामी संपूर्ण विदर्भातील जनजीवन विस्कळीत झालेले दिसते आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचीही माहिती असून तोतलाडोह, गोसेखुर्द अशा प्रकल्पांमध्ये पाणी साठल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.
नागपूरमध्ये काल रात्रीपासून सुरु झालेला पाऊस हे वृत्त लिहेपर्यंत थांबला नव्हता. परिणामी आज नागपूरकरांना सूर्यदर्शन होऊ शकले नाही. दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांनी घरात थांबणेच पसंत केले. ग्रामीण भागातही हीच परिस्थिती होती. या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तुरी या पिकांवरही विपरीत परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे तोतलाडोह आणि गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले गेले. पाण्याच्या सांडव्याच्या तीरावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा यवतमाळ , अमरावती येथेही पावसाने हजेरी लावली. संततधारेमुळे तिथलेही जनजीवन विस्कळीत झाले होते. अकोला, बुलढाणा आणि वाशीम येथेही सतत पाऊस सुरु असल्याची माहिती मिळाली हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तास विदर्भावर अशीच संततधार सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment