सर्वसाधारणपणे
दै. सामनामध्ये अशी प्रदीर्घ तीन दिवसींची मुलाखत यायची ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची.
स्व. शिवसेनाप्रमुखांचे मराठी मनातील स्थान शरद पवार कधीच घेऊ शकणार नाहीत.
- अविनाश पाठक
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामना मध्ये 11 जुलै ते 13 जुलै अशी तीन दिवस एक
मुलाखतीची मालिका प्रसिद्ध झाली. सर्वसाधारणपणे दै. सामनामध्ये अशी प्रदीर्घ तीन
दिवसींची मुलाखत यायची ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. त्या मुलाखतींना
एक वेगळे महत्त्व होते. महत्त्वाइतकाच या मुलाखतींना एक वाचकही होता.
बाळासाहेबांंची मुलाखत येणार असली की तीन दिवस आधीपासूनच जाहिराती सुरु व्हायच्या
आणि त्या तीन किंवा पाच दिवसांमध्ये सामनाचा अंक हातोहात विकला जायचा, नव्हे त्या दिवसांमध्ये
अतिरिक्त अंकही छापावे लागायचे. बाळासाहेबांनंतर शिवसेनेची धुरा त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी सांभाळली. त्यामुळे मग सामनामध्ये उद्धवपंतांच्याही अशाच
प्रदीर्घ मुलाखतींची
मालिका प्रकाशित होणे सुरु झाले.सामनाच्या वाचकांनी हा बदल अगदी सहज स्वीकारला.
सामना हे शिवसेनेचे मुखपत्र त्यामुळे पक्षप्रमुख कोणीही असो, तो सामनाच्या मुलाखतीतून
दिशादर्शन करणार असेल तर त्याचे
स्वागतच करायचे हे शिवसैनिकांचे आणि शिवसेनाप्रेमींचे धोरण राहिले.
![]() |
बाळासाहेब ठाकरे |
मात्र 11 जुलैपासून
प्रसारित झालेली ही मुलाखत उद्धवपंतांची नव्हती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उभ्या
महाराष्ट्रात जाणता राजा म्हणून गौरवले (?) गेलेले महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य शरद पवार यांची होती.
सामनाच्या पहिल्या पानावर बाळासाहेबांचा मान शरदरावांना दिला जातो आहे ही बाब
सर्वच कट्टर शिवसेनाप्रेमींना खटकणारी होती. ज्या शरद पवारांशी बाळासाहेबांनी उभा
दावा मांडला होता, ज्याला
मैद्याचे पोते, बारामतीचा
ममद्या असल्या शेलक्या विशेषणांनी
जाहीररित्या बाळासाहेब गौरवत होते, ज्या शरद पवारांचे आणि शिवसेनेचे कायम वैचारिक मतभेद होते त्या शरद
पवारांना बाळासाहेबांची जागा देत तीन दिवस त्यांच्या मुलाखतींची मालिका प्रकाशित
करणे ही बाब न पचण्याजोगीच होती.
घ्या समजून राजे हो....
तसा विचार केल्यास गत आठ महिन्यात शिवसेनेत बर्याच गोष्टी
शिवसैनिकांना न पचणार्या अशा घडल्या आहेत. सत्तेसाठी कांँग्रेस आणि राष्ट्रवादीशी
केलेली युती, ही युती
करीत असताना आणि नंतर सरकार चालवताना अनेक ठिकाणी केलेली तात्विक तडजोड, त्यामुळे शिवसेनेची जनमानसात मलिन होत असलेली प्रतिमा या सर्व बाबी जुन्या जाणत्या शिवसेनाप्रेमींना
आणि शिवसैनिकांना खटकणार्याच होत्या. मात्र शरद पवारांची तीन दिवसांची मुलाखतीची
मालिका सामनात प्रकाशित होणे आणि तीही ज्या जागी आणि ज्या दिमाखात हिंदुहृदयसम्राटांची
मुलाखत प्रकाशित होत होती त्याच जागी पवार विराजमान होणे हे मात्र चांगलेच
दुखावणारे होते.
मात्र सामनाकारांनी शिवसैनिकांच्या आणि हितचिंतकांच्या भावनांचा
विचार करायचाच नाही असे ठरवले असल्यामुळे ही मुलाखत घेतली गेली. एका वृत्तवाहिनीने
ती प्रसारितही केली आणि सामनामध्ये सलग तीन दिवस दिमाखाने प्रकाशितही झाली. या
मुलाखतीवर आधारित वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी बातम्याही चालवल्या. परिणामी
गेले काही दिवस या मुलाखतीचीच आणि नंतर त्यातील मुद्यांचीच चर्चा सुरु होती. ही
चर्चा अजूनही काही दिवस सुरू राहिलच यात शंका नाही.
या मुलाखतीत पवारांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. त्यातील काही
मुद्यांवरच मी प्रस्तुत लेखात आपली मते मांडणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे शिवसेना
सोबत असल्यामुळे भाजप 2019 मध्ये 105 जागांपर्यंत पोहोचू शकला
अन्यथा भाजप 50 च्या वर
गेला नसता. या मुद्यावर तशा अनेक राजकीय विश्लेषकांनी आपली मते मांडलेली आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमच्यामुळे
भाजप महाराष्ट्रात वाढला अशी मुजोरी शिवसेनेतील नेते आणि
शिवसेनेशी वैचारिक बांधिलकी ठेवणारे पत्रकार कायम करतात. मात्र हे सर्व कथित विचारवंत
हे विसरतात की ज्यावेळी शिवसेनेचे कुठेही अस्तित्व नव्हते त्यावेळी देखील भाजप हा
जुन्या जनसंघाच्या रुपात अस्तित्वात होता. अगदी शिवसेनेची आणि भाजपची युती
झाली त्यावेळेसही विधानसभेत शिवसेनेची एकही जागा नव्हती तर भाजपच्या 16 जागा होत्या. त्याचसोबत
महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार दुसर्या क्रमांकावर राहून
लक्षणीय मते घेत होते. काही पत्रकारांनी गत दोन दिवसात या संदर्भातील आकडेवारीही
प्रसिद्ध केलेली आहे. तरीही आमच्या जोरावर भाजपा वाढला ही मुजोरी शिवसेनेचे नेते
करतात. ती त्यांची अगतिकता आहे हे मान्य केले तरी शरद पवारांसारख्या राजकारण कोळून
प्यालेल्या ज्येष्ठ नेत्याने हे विधान करायचे म्हणजे राजकीय अपरिहार्यतेपोटी
वास्तवापासून दूर जाण्याचा हा लटका प्रयत्न असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राचे
वास्तव काय याची पूर्ण कल्पना पवारांना आहे. मात्र राजकीय स्वार्थापोटी त्याकडे
हेतुपुरस्सर दुर्लक्ष करायचे आणि चालू मित्र सुखावेल अशी धादांत खोटी विधाने
करायची हे शरद पवारांनाच साधू शकते. माझ्या आठवणीप्रमाणे 2007 साली नागपूरच्या हॉटेल
चिंदबरामध्ये एका पत्रपरिषदेत बोलताना शिवसेना नेते मनोहर जोशी म्हणाले होते की शरद पवार
जे बोलतात त्याच्या विपरित वास्तव असते आणि पवारही बोलतात त्याच्या विपरित वागतात.
प्रस्तुत वक्तव्य हे त्यातलाच प्रकार वाटू शकतो.
पवारांनी दुसरे विधान असे केले आहे की, महाआघाडी एकत्र आली ती विशिष्ट ध्येयधोरणांमुळे
आणि आता हीच धोरणे घेऊन महाआघाडी पुढील निवडणूका एकत्रपणे लढेल. पवारांचे हे विधान
म्हणजे या शतकातील सर्वात मोठा विनोद असे म्हणता येईल. शिवसेना आणि काँग्रेस
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्यावेळी कसे आणि कां एकत्र आले हा इतिहास
महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. हे दोन पक्ष आताही या सत्तेत किती दिवस एकत्र
नांदतील याबाबत सर्वांच्या मनात शंका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही
काँग्रेसच्याच विचारधारेवर बनलेला पक्ष आहे. त्यामुळे आज सत्तेच्या गुळाला
चिकटलेले मुंगळे जसे एकत्र येतात तसे हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. ही तीन पायांची
शर्यत पुढील निवडणुकीत एकत्र लढणे तर राहू द्या पण या सरकारमध्येच किती दिवस टिकते हा खरा
प्रश्न आहे. त्यामुळे पुढील निवडणूकीत तीनही पक्ष एकत्र लढतील हे पवारांचे
स्वप्नरंजन म्हणजे मुंगेरीलाल के हसिन सपने असेच म्हणावे लागेल. चुकूनमाकून लढलेच
एकत्र तर प्रत्येक मतदारसंघात
किमान दोन बंडखोर समोर येतील आणि ते महाआघाडीची वाट लावतील हे सांगण्यासाठी
वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा दर्प
असल्याचे निदान पवारांनी या मुलाखतीत केले आहे. सत्तेचा दर्प कोणाला नसतो पवार
साहेब! धरणात पाणी नसेल तर आम्ही धरणात जाऊन मुतायचे का? असे विचारणारेही सत्तेचा
दर्प असणारेच मानले जातात. मात्र आपल्यासारखे कुटील राजनीती करणारे आणि साधन
सुचिता गुंडाळून ठेवणारे गॉडफादर मिळाल्यामुळे ते पुन्हा दिमाखात सत्तेत येऊन
बसतात. फडणवीसांनी आणि भाजपने सत्तेसाठी काय केले याचा आढावा पवार घेतात.
मात्र त्याच पवारांनी सत्तेसाठी 1978
मध्ये वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला होता हे पवार भलेही
विसरतील पण महाराष्ट्रातील जनतेची स्मृती इतकीही कच्ची नाही. पवारांनी सत्तेसाठी
काय काय शागल्ये
केली हे सर्वश्रृत आहे. तरीही पवार फडणवीसांवर आरोप करतात.समोरच्यावर एक बोट
दाखवले की तीन बोटे आपल्याकडे असतात हे मात्र शरद पवार सोईस्करपणे विसरतात.
पाकिस्तान हा भारताचा खरा शत्रू नसून खरा शत्रू हा चीन आहे असे विधानही शरद
पवारांनी यावेळी केलेले आहे. मुस्लिमांचे लांगुलचालन ही काँग्रेसची फार जुनी नीति
राहिलेली आहे. त्याच धोरणातून मूळचे काँग्रेसी असलेल्या शरद पवारांचे हे विधान आहे
हे स्पष्टच दिसते आहे. चीनने यापूर्वी भारतावर फक्त एकदा आक्रमण केले होते. मात्र
पाकिस्तान बनला तोच मुळी भारताचे दोन तुकडे करून. त्यानंतर 1947, 1965, 1971, 1999 अशी सतत
भारतावर आक्रमणे करण्याची परंपरा पाकिस्तानने कायम ठेवली आहे. आजही काश्मीर
आम्हाला हवा म्हणून पाकिस्तानच्या कुरबुरी सुरुच आहेत. या देशात दहशतवादी घुसवून
देशात अशांतता निर्माण करण्याचे काम पाकिस्तानच करत आला आहे. या देशाचे सर्वोच्च
श्रद्धास्थान असलेले संसद भवन उडवण्याचा प्रयत्नही पाकिस्तान स्पॉन्सर्ड कारस्थानच होते हे
स्पष्ट झाले आहे. मुंबईतील बॉम्बस्फोट, 26/11 चा हल्ला अशा अनेक घटनांनी पाकिस्तानचे आपल्याशी
असलेले शत्रूत्व स्पष्ट झाले आहे. तरीही पवारांनी पाकिस्तानला झुकते माप द्यावे हे
न पटण्याजोगे
आहे.
नेहरु परिवाराने देशासाठी केलेल्या त्यागाबद्दल शरद पवारांनी विधान
केले आहे. त्याला संदर्भ प्रियंका गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस
दिल्याबद्दल आहे. मुळात प्रियंका गांधी या कोणत्याही शासकीय पदावर कधीच नव्हत्या.
मग गेली 28 वर्ष
त्यांना स्वतंत्र सरकारी बंगला देण्याचे नेमके प्रयोजन काय याचाही खुलासा व्हायला
हवा. इथे नेहरु परिवाराचा देशासाठी असलेला त्याग लक्षात घेऊन अशा सवलती द्यायला
हव्या असा खुलासा पवार करतीलही मात्र त्याग काय फक्त नेहरु कुटुंबांनेच केला आहे
काय याचे उत्तरही पवारांनी द्यायला हवे. ज्या महात्मा मोहनदास करमचंद गांधींनी या
देशासाठी सर्वोच्च त्याग केला त्यांच्या वारसांना गत 70 वर्षात काँग्रेसने काय दिले
याचे उत्तरही या देशाला मिळायला हवे. नेहरु परिवाराने त्याग केला असेलही मात्र
त्याचबरोबर या परिवाराला देशानेही खूप काही दिले आहे. या परिवारातील तीन
व्यक्तींना या देशाने पंतप्रधानपदही दिले. आजही देश आवश्यक तो मान पं. नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव
गांधींना देतो आहेच. मात्र पिढ्यान्पिढ्या त्याची फळे पुढच्या पिढ्यांनी चाखावी हा
आग्रह मात्र अनाठायी आहे. आपल्या देशातील राजकारणामध्ये आजही घराणेशाही आहे.
पवारांच्या घरातही शरदराव, अजित आणि
सुप्रिया आणि आता
पुढच्या पिढीत पार्थ आणि रोहित अशी घराणेशाही सुरुच आहे. तुम्ही आपल्या घरात हवे
ते करा पण त्यासाठी देशाला वेठीला का धरता हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली
आहे.
या मुलाखतीत अजून बरेच मुद्दे आहेत. मात्र जागेअभावी आजच सर्वच
मुद्यांचा परामर्श घेणे शक्य नाही. असे असले तरी लवकरच इतर मुद्यांचाही सविस्तर
परामर्श घेता येईल.
एकूणच गत आठ महिन्यात शिवसेनेने आपली परंपरा सोडत सत्तेसाठी
राष्ट्रवादी काँग्रेसशी अभद्र युती केली. सद्य स्थितीत जे मुख्यमंत्रीपद मिळणे
कठीण होते ते मुख्यमंत्रीपद पवारांच्या मदतीने अनैतिकपणे का होईना पण मिळाले.
त्यामुळे पवारांना आता जास्तीत जास्त डोक्यावर कसे घेता येईल. ते डोक्यावर घेणे
सध्या शिवसेनेने सुरु केले आहे. त्यासाठी शिवसेनाप्रमुखांचीही जागा ते शरद
पवारांना द्यायला तयार झाले आहे. सत्तेसाठी लाचार झाल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय
राऊत कदाचित पवारांना बाळासाहेबांची जागा देतीलही मात्र सर्वसामान्य शिवसैनिकाच्या
आणि महाराष्ट्रातील तमाम बाळासाहेबप्रेमींच्या मनातील स्थान पवार मिळवू शकणार
नाहीत आणि संजय राऊत त्यांना ते स्थान कधीच मिळवून देऊ शकणार नाहीत या वास्तवाचे भान
सर्वांनीच ठेवायला हवे.
तुम्हाला पटतंय का हे?
त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजेहो......
हा लेख प्रकाशित करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक....
लेखासंदर्भात आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.....
अविनाश पाठक यांचे विविध लेख वाचण्यासाठी त्यांचे फेसबुक पेज
www.facebook.com/BloggerAvinashPathak वर भेट देउ शकता....
0 comments:
Post a Comment